रुपयाची पडझड; इंधन दरवाढीचा विक्रम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रुपयाची पडझड सुरूच असून, एका डॉलरसाठी तब्बल 71.21 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विक्रमी भडका कायम आहे. दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स तब्बल 333 अंकांनी घसरला.

ऑगस्टपासून सुरू असलेली रुपयाची निच्चांकी घसरणीची वाटचाल सप्टेंबरमध्येही कायम राहिली. बाजार उघडला तेव्हा एका डॉलरसाठी 71.21 रुपये मोजावे लागले. त्यात 11 पैशांची कशीबशी सुधारणा होऊन 71.10 पर्यंत रुपया खाली आला. रुपयाचे मूल्य निच्चांकी येण्याचा हा विक्रमच आहे. 16 ऑगस्टला रुपया 71 पर्यंत खाली घसरला होता. वर्षभरात रुपया तब्बल 11 टक्क्यांनी खाली आला आहे.

बाजार उठला
मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सच्या घसरणीला सुरुवात झाली. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 333 अंकांनी कोसळला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 38312.52 अंकावर स्थिरावला होता.

पेट्रोल 86.24 रुपयांवर
रुपयाचे अवमूल्यन, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 78 डॉलर्स आणि अमेरिका-चीन यांच्यातील ट्रेडवॉर याचा फटका पेट्रोल-डिझेल दरवाढीला होत आहे. त्यातच सरकारकडून भरमसाठ करवसुलीमुळे इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.
सोमवारी पेट्रोल 39 पैसे तर, डिझेल 31 पैशांनी महाग झाले. 16 ऑगस्टपासून पेट्रोल 2 रुपये तर डिझेल अडीच रुपये प्रति लिटरने महागले आहे.
महानगरांमध्ये देशात सर्वात महाग मुंबईत पेट्रोल 86.72 रुपये आणि डिझेल 75.44 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

summary- petrol and diesel record break hike