
पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदी कारवाईच्या निर्णयाची अंमलबजावणी पालिका आगामी काळात आणखी कठोरपणे करणार आहे. आगामी काळातील सण-उत्सवात बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने पालिका आधी उत्पादकांसह वापरकर्ते-नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्टनंतर दुकानांसह समारंभांवर धाडी टाकण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अतिवापर होणाऱया अविघटनशील प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. शिवाय आरोग्याला घातक असणाऱया प्लॅस्टिकच्या पिशव्या पाणी तुंबण्यालाही कारणीभूत ठरत आहेत. 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती. मात्र 1 जुलैपासून पालिकेच्या माध्यमातून कारवाई पुन्हा सुरू आहे. यातच राज्य सरकारनेही मंगळवारीच पुन्हा एकदा बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादक, विव्रेते आणि वापरकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या वस्तूंच्या वापरावर बंदी
ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्यपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन वापर करण्यास बंदी आहे.
16 हजार धाडी 7 लाख 65 हजारांचा दंड वसूल
आतापर्यंत सुमारे महिनाभरात दुकानांवर 16 हजार 198 धाडी टाकण्यात आल्या असून 7 लाख 65 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चार जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
597.755 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. जप्त केलल्या प्लॅस्टिकचा सध्या पालिकेच्या गोडावूनमध्ये साठा केले जात असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. तर कारवाई टाळण्यासाठी मुंबईकरांनी बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
25 हजार दंड, 3 महिने तुरुंगवास
प्लॅस्टिक उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी अधिसूचना-नियमाचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱया गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येतो.






























































