
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱयावर येत असून उद्या त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रोच्या वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्याच सोहळ्याच्या व्यासपीठावरुन ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भुयारी मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर कफ परेड आणि वरळी सायन्स म्युझिअम स्थानकातून एकाचवेळी दोन स्वतंत्र मेट्रो धावणार आहेत.
- आरे ते कफ परेडदरम्यानची संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असून गुरुवारपासून या पूर्ण मार्गावर सकाळी 5.55 वाजल्यापासून रात्री 10.30 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे.
- तीन दशकांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चर्चेत आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळाप्रमाणे या विमानतळाची रचना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चारपैकी एका टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे.