प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर मोदींनी घेतला आईचा आशिर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

लोकसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातमधील आपल्या घरी पोहोचले. येथे त्यांनी आई हिराबेन मोदी यांनी भेट घेतली आणि पाया पडून आशिर्वाद घेतला. नरेंद्र मोदी 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता दुसऱ्यांदा हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

रविवारी गुजरात दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी गुजरातच्या भाजप मुख्यालयामध्ये हजेरी लावली. यापूर्वी त्यांनी सरदार वल्लबभाऊ पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून ते भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि पुढील पाच वर्ष जबाबदारी वाढवणारे असल्याचे म्हटले. तसेच गुजरातच्या नागरिकांचेही त्यांनी आभार मानले.

भाजप मुख्यालयातील कार्यक्रम झाल्यानंतर मोदी कडक बंदोबस्तामध्ये आपली घरी पोहोचले. येथे त्यांनी आई हिराबेन मोदी यांचा पाया पडून आशिर्वाद घेतले. मोदी उद्या म्हणजे 27 मे रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. येथे जनतेने त्यांना दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले.

याआधी शनिवारी एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड झाली. संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एनडीएचे बडे नेते आणि नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला.