नागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर

499

नागरिकत्व सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या कायद्याविरोधात हिंसाचार करणारे आणि जाळपोळ करणारे कोण आहते, हे त्यांच्या कपड्यांवरूनच कळते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. काँग्रेस आता पाकिस्तानचे काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. झारखंडच्या दुमकामध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपचा विरोध करता करता काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असेही ते म्हणाले.

पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आश्रय घेतलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध आणि जैन समुदायाच्या शरणार्थिंना नागरिकत्व देण्याबाबतचे विधेयक संसदेच्या दोन्ही सदनात बहुमताने मंजूर करण्यात आले. त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्ष विनाकारण वाद उपस्थित करत आहेत. हिंसाचार घडवणारे आणि जाळपोळ करणारे कोण आहेत, ते त्यांच्या कपड्यांवरून समजते, असेही मोदी म्हणाले. तुम्ही जे करत आहात, ते देश बघत आहे. नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि संसदेने हा कायदा करून देशाच्या एकतेचे रक्षण केले आहे, हे जनतेला समजत आहे, असे त्यांनी सांगितले.

आसाम आणि ईशान्येकडील नागरिकांनी या प्रसंगात धैर्य दाखवले आहे. आपण त्यांचे अभिनंदन करतो. या मुद्द्यावर हिंसाचार घडवण्याचे प्रयत्न त्यांनी हाणून पाडले आहेत. देशाचा मान-सन्मान वाढावा, असेच काम या राज्यातील नागरिकांनी केले आहे. त्यांची नाराजी आणि शंकाही ते व्यक्त करत आहेत. हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी सांगितले. झारखंडच्या विकासासाठी जेएमएम आणि काँग्रेसकडे कोणतीही योजना नाही. तसेच राज्याचा विकास करण्याची त्यांची इच्छाही नाही. याआधीही त्यांनी राज्यासाठी काहीच केले नाही. फक्त नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा, भाजपचा विरोध करा, हीच त्यांची विचारधारा आहे. भाजपचा विरोध करत करत आता ते देशाचाही विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या