हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून जातीय हिंसाचार वाढला असून, चिथावणीखोर वक्तव्यांनी परिस्थिती बिघडवली जात आहे. एकंदरित परिस्थिती गांभीर्याने न घेतल्यास देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी एक संयुक्त निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. लोकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करतानाच जातीय हिंसाचार करणाऱ्यांना कठोर शासन देण्याची मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
हिंदुस्थानात अनेक राज्यांत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून, यामध्ये राजकीय प्रवृत्तींचा समावेश आहे. देशातील सामाजिक सलोखा धोक्यात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर मौन बाळगून आहेत ही बाब धक्कादायक आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, देबब्रत बिस्वास, मनोज भट्टाचार्य, दीपांकर भट्टाचार्य, पी. के. कुन्हालीकुट्टी या 13 नेत्यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे.
गणवेश, श्रद्धास्थान, सण-उत्सव, भाषा, खाद्य संस्कृती यावरून निरर्थक वाद निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न केला जात आहे. ही बाब खूपच गंभीर आहे. ‘हेट स्पीच’चे प्रकार वाढत चालले आहेत. उघडपणे चिथावणी देणारी भाषणे केली जात असूनही त्यावर कोणतीच ठोस कारवाई केली जात नाही. उलट अशा व्यक्तींना संरक्षण दिले जात आहे. असे नमूद करत त्यावरही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील अनेक राज्यांत अलीकडेच जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्याचा याच निवेदनात निषेध करण्यात आला. ‘या घटनांबाबत जे रिपोर्ट मिळत आहेत त्यानुसार ज्या भागांत या घटना घडल्या तिथे एकसारखा पॅटर्न राबवला गेला. धार्मिक मिरवणूक काढण्याआधी प्रक्षोभक भाषणे दिली गेली. सोशल माध्यमांचाही द्वेष पसरवण्यासाठी वापर करण्यात आला. ही सगळीच स्थिती भीतीदायक आणि चिंता वाढवणारी आहे’, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक सौहार्य कायम राखण्यासाठी सगळ्याच पक्षांनी स्वतंत्रपणे तसेच संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकताही या निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवेदनाला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































