पीओकेत 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, हिंदुस्थानी लष्कराचे टॉप कमांडर राजू यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशाला भिडणारी महागाई, कोरोनाचा प्रकोप आणि विरोधी पक्षांनी केलेली सरकारची घेराबंदी यापासून पाकिस्तानच्या जनतेचे लक्ष हटवण्यासाठी लष्कर, आयएसआय आणि पाकव्याप्त कश्मीरातील दहशतवादी गटांच्या मदतीने एलओसीवर रक्तपात घडवत घुसखोरीचा भीषण कट पाकिस्तानने रचला आहे. त्यासाठी पाकव्याप्त कश्मीरातील लाँच पॅडवर 250 कडवे सशस्त्र दहशतवादी सज्ज असल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली असल्याचा दावा हिंदुस्थानी लष्कराचे टॉप कमांडर बी. एस. राजू यांनी केला आहे. मात्र हिंदुस्थानी सुरक्षा दले कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचा निर्वाळा राजू यांनी दिला.

पाकिस्तानात अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड भडकल्या आहेत. पाकिस्तानी जनता एकवेळच्या रोटीला मोताद झाली आहे. त्यातच कोरोना महामारी आणि सर्वच 11 विरोधी पक्षांनी सत्ता उलथण्यासाठी छेडलेले तीव्र आंदोलन यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार मोठय़ा संकटात आहे. शिवाय विरोधकांनी जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी लष्करालाही देशाच्या दुर्गतीसाठी जबाबदार धरले आहे. त्यामुळे बाजवा ब्रिगेड आणि इम्रान सरकार जनतेचे लक्ष देशातील खराब स्थितीकडून अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून एलओसीवर दहशतवाद्यांना घुसखोरी करायला लावून पाकडय़ांना रक्तपात घडवायचा आहे. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कर एलओसीवर अलर्ट असल्याचे चिनार काॅर्पस्चे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू त्यांनी सांगितले.

एलओसीवर प्रचंड तणाव, हिंदुस्थानी लष्कर अलर्टवर

कश्मीर खोऱयातील बर्फवृष्टी आणि वाढत्या थंडीचा लाभ उठवून पाकव्याप्त कश्मीरातील 200 ते 250 दहशतवादी लाँच पदावरून हिंदुस्थानात घुसण्याचा तयारीत आहेत. एलओसीवरून कश्मीर खोऱयात थेट घुसखोरीसोबतच पीर पंजाल विभागातूनही दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याची दाट शक्यता आहे. कमी उंचीच्या पहाडी विभागातून हे सशस्त्र दहशतवादी एलओसी पार करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कश्मीर सीमेवर तणावाचे वातावरण कायम असून हिंदुस्थानी लष्कर कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी अलर्ट असल्याचे चिनार काॅर्पस्चे प्रमुख लेफ्टनंट जनरल राजू यांनी स्पष्ट केले.