आठ हजारांची लाच घेताना पोलीस शिपायाला रंगेहात पकडले

अपघातील गुन्हातील पोलीस ठाण्यात जमा केलेले दुचाकी वाहन परत देण्यासाठी मदत करतो म्हणून 40 हजार रुपयांची लाचेची मागणी करत त्यातील 8 हजार रुपये स्वीकारताना मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संदीप भीमा रावते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे पोलीस शिपाई भीमा रावते व सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार 24 वर्षीय तरुणाने केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार याची अपघातामधील गुन्ह्यातील दुचाकी वाहन परत देण्यासाठी मदत करतो म्हणून 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.23 डिसेंबर रोजी तक्रारदार याचे काम करून देण्यासाठी 8 हजार रुपये दोन्ही लोकसेवक यांनी लाच मागणी करून रक्कम संदीप रावते यांनी पंचा समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, महिला पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस हवालदार नवनाथ वाळके यांनी केली आहे.