
>> आशीष बनसोडे
ऐतिहासिक वारसा असलेली पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची दगडी इमारत आता जमीनदोस्त होत आहे. ही पुरातन इमारत इतिहासजमा होत असली तरी गुन्हे शाखेच्या शौर्याची अखंड साक्ष देणाऱया ‘त्या’ इमारतीचे दगड जतन करण्यात येणार आहेत. त्या दगडातून नायगावच्या परेड मैदानात किल्ल्याची अभेद्य भिंत साकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
एक शतकाहूनही अधिक काळ मुंबई गुन्हे शाखेची दगडी इमारत पोलीस आयुक्तालयात मोठय़ा दिमाखात उभी होती. या इमारतीचा दरारा अवघ्या देशभरात होता. एकापेक्षा एक दिग्गज अधिकाऱयांनी त्या इमारतीत बसून गुन्हेगारी संपविण्याचे काम फत्ते केले. अशी ही ऐतिहासिक दगडी इमारत काळाच्या ओघात कमपुवत होऊ लागल्याने तिला जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन सहा मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. असे असले तरी त्या दगडी इमारतीच्या दगडांचा योग्य सन्मान राखण्यात येणार आहे. ते दगड वेगळय़ा पद्धतीने जतन करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून नायगावच्या परेड मैदानात या दगडातून किल्ल्याची अभेद्य भिंत उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांकडून समजते.
परेड मैदानाला नवे रूप मिळणार
नायगावच्या पोलीस मुख्यालयात परेड मैदान असून त्या मैदानालाही ऐतिहासिक वारसा आहे. आता गुन्हे शाखेच्या शौर्याची साक्ष देणाऱया दगडी इमारतींच्या दगडातून तिथे किल्ल्याची भिंत उभी राहणार असल्याने या परेड मैदानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

































































