
प्रभाकर पवार, [email protected]
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण २ सप्टेंबर रोजी मागे घेतले आणि मुंबई पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले असतानाच जरांगे-पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईवर धडक दिली. मुंबईकरांचे ‘हृदय’ असलेल्या दक्षिण मुंबईला चारही बाजूंनी गराडा घातला. मुंबई शहराचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा आंदोलकांच्या मानसिकतेची, त्यांच्या आक्रमक पवित्र्याची जाणीव होती. पोलीस आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यांना, पोलिसांना आंदोलकांशी संयमाने वागण्याच्या सूचना दिल्या. त्याचे तंतोतंत पालन दक्षिण मुंबईत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. मराठा आंदोलकांनीही पोलिसांना सहकार्य केले. कुणीही वाद घातला नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत सतत पाच दिवस मुंबई पोलीस डोळ्यांत तेल घालून काम करीत होते. कुणीही घरी गेले नव्हते. त्याचे चीज झाले. मराठ्यांच्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व त्यांच्या सहकारी पोलिसांबरोबरच आंदोलकांनाही द्यावे लागेल. पोलीस हा एक ‘डिसिप्लिनरी’ फोर्स आहे. आदेश आला की, त्यांना आहे त्या अवस्थेत ड्युटीवर हजर व्हावे लागते. त्यातील बऱ्याच पोलिसांना रक्तदाब व मधुमेहासारखे गंभीर आजार असतात. तरीही ते आणीबाणीच्या वेळेला आपली ड्युटी चोख बजावतात. मराठा आंदोलन हाताळतानाही त्यांनी तेच केले. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत.
मराठा समाजाचे यापूर्वीच मुंबईत आलेले मोर्चेही शांततेत पार पडले होते. अगदी pin drop silence असलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाची तर साऱ्या भारतीयांनी प्रशंसा केली, परंतु ११ ऑगस्ट २०१२ रोजी मुसलमानांनी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाची आठवण आली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. शनिवारचा तो दिवस होता. आसाम व म्यानमार येथील दंगलीत मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा दावा करून मुंबईच्या बहुचर्चित रझा अकादमीने निषेधासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. जोगेश्वरीतील बेहराम बाग, ठाणे, मुंब्रा, गोवंडी, देवनार, कुर्ला आदी भागांतील समाजकंटकांनी रझा अकादमीच्या या मोर्चात भाग घेतला होता. त्या वेळी अरुप पटनायक हे मुंबईचे आयुक्त, तर रजनीश शेठ हे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
आसाम व म्यानमारमधील दंगलीचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने मोर्चा आयोजित केला आहे इतकीच माहिती मुंबईच्या गुप्तचर यंत्रणांकडे होती. त्यामुळे या मोर्चाची कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फारशी दखल घेतली नव्हती. सारे मुंबई पोलीस बेसावध होते. त्याचाच फायदा मुसलमानांच्या मोर्चात सामील झालेल्या समाजकंटकांनी घेतला. मुसलमान नेत्यांची आझाद मैदानातील व्यासपीठावरील भाषणे संपल्यावर समाजकंटकांनी आझाद मैदानात हैदोस घालण्यास सुरुवात केली. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ले सुरू केले. पोलीस शिपाई महिलांचे कपडे फाडले. प्रसारमाध्यमांची वाहने, कॅमेरे व ओबी व्हॅन फोडल्या. अचानक हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात २ मोर्चेकरी ठार झाले, तर ५३ पोलीस जखमी झाले. काही पोलीस आयुष्यातून उठले, अपंग झाले. या हिंसक मोर्चात समाजकंटकांनी सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान केले. या दंगलप्रकरणी पोलिसांनी ७० जणांना अटक केली. परंतु दंगलीचे कुर्ला मशिदीतून आयोजन करणारा बांगलादेशी मुल्ला काही पोलिसांना शेवटपर्यंत सापडला नाही. अरूप पटनायक यांना मात्र आपले आयुक्तपद गमवावे लागले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अरूप पटनायक यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. सत्यपाल सिंह यांची नियुक्ती केली. अशा या भयानक, हीन, अधम प्रसंगाचे सावट मराठा आंदोलनाच्या वेळी मुंबई पोलिसांवर होते, परंतु सुदैवाने कोणतीही अशुभ घटना मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात घडली नाही.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व त्यांचे सहकारी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा आणि सुव्यवस्था), अनिल कुंभारे (वाहतूक), अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना, परमजितसिंह दहिया, डॉ. अभिनव देशमुख, डॉ. महेश पाटील, विक्रम देशमाने तसेच मुंबई पोलीस दलातील दक्षिण मुंबईत बंदोबस्तासाठी असलेले सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी ज्या पद्धतीने जरांगे यांचे आंदोलन हाताळले… गणेशोत्सवासारखा भव्यदिव्य राज्य महोत्सव शांततेत पार पाडला, त्याला तोड नाही. मुंबई पोलिसांना खरोखर संयमाचे प्रतीक म्हणावे लागेल. अशा या मुंबई पोलिसांना मुंबईकरांचा सलाम!