लग्नासाठी पोलीस परवानगी आवश्यक, पालिकेचीही गर्दीवर नजर राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात आजपासून मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे आधीच मुहूर्त निश्चित झालेल्या लग्नसोहळ्यांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र लग्नं ठरलेल्या मुहूर्तावर पार पडणार असली तरी सोहळ्यांसाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य राहणार असून गर्दीवर पालिकेचीही नजर राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कोरोनामुळे याआधी लग्नसोहळ्यास केवळ 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना पुन्हा वाढू लागल्यामुळे दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच निश्चित करण्यात आलेल्या लग्नसोहळे रद्द करावे लागणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र लग्न सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. मात्र यासाठी कोरोना खबरदारीचे सर्व नियम पाळणे अनिवार्य राहील.

यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर पाळावे लागेल. शिवाय लग्न सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात 24 ते 27 तारखेपर्यंत सलग मुहूर्त आहेत. तर 30 एप्रिलला या महिन्यातील शेवटचा मुहूर्त आहे.