संशयावरून केली सोने कारागीराची हत्या; पत्नीला भडकवल्याचा होता संशय

28

सामना ऑनलाईन । मुंबई

सोने कारगीर नितेश सोनीच्या हत्येचा उलगडा  दिंडोशी पोलिसांनी केला. हेमंत सोनी असे त्याचे नाव आहे. कर्ज चुकवण्यासाठी लुटमारीच्या हेतूने आणि पत्नीला भडकवल्याचा मनात राग धरून हेमंतने नितेशची हत्या केली. हत्येपूर्वी हेमंतने आपण गावी जाण्याचा कांगावा केला होता.

नितेश हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून तो गेल्या चार वर्षांपासून  मालाडच्या खोतकुवा चाळीत सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करत होता. 11 मे रोजी नितेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती कळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला.

अतिरिक्त आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त ज्ञानेश्वर जवळकर, सुभाष वेळे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने, पोलीस निरीक्षक गणेश पवार, मनोहर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, दिग्विजय पाटील, संदीप म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र जाधव, बाळासाहेब शिंदे, स्वप्नील पाटील, नितीन पेटकर, नित्यानंद उबाळे, योगेश कन्हेरकर, मुसा देवशी, अविनाश केदार, घोणे, जिनपाल, वाघमारे, वाडीकर, कुंभार, पाटील, घडशी, शेख, वाल्हे, जाधव, देशमुख, पाटील, शिंदे, पवार या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी तपास करून राजस्थानला पळून गेलेल्या हेमंतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. हेमंतला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

धडा शिकवण्यासाठी रचला हत्येचा कट

हेमंत व नितेश हे दोघेही  सोन्याचे एकत्र दागिने बनवण्याचे काम करत होते पण कर्जबाजारीमुळे हेमंतचा कारखाना बंद झाला होता. त्यातच हेमंतची पत्नी माहेरी निघून गेली होती. नितेश हा पत्नीला भडकवत असल्याचा हेमंतच्या मनात संशय होता. नितेशला धडा शिकवण्यासाठी हेमंतने काही दिवस अगोदर कट रचला होता.

गावी जाण्याचा केला बहाणा

हत्येच्या अगोदरच्या रात्री हेमंतने आपण गावी जात असल्याचा बहाणा केला. नितेश हा हेमंतला सोडण्याकरिता मालाडला आला. त्यानंतर हेमंत गावी न जाता मुंबईतच राहिला. शुक्रवारी रात्री नितेश हा कारखान्यात काम करत बसला होता तेव्हा हेमंत कारखान्यात आला. नितेशला जास्त ऑर्डर मिळाली ही माहिती हेमंतला मिळाली होती. मदत करत असल्याचे हेमंतने भासवले. बेसावध असताना हेमंतने नितेशची हत्या केली. हत्येनंतर तळमजल्यावरील डीव्हीआर घेऊन त्याने पळ काढला.

आपली प्रतिक्रिया द्या