
कर्ज झाल्याने पोलीस शिपाईने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कांजुरमार्ग येथे घडली. निखिल साबळे असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी कांजुरमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
निखिल हा मूळचा सांगलीचा रहिवासी होता. चार वर्षांपूर्वी तो मुंबई पोलीस दलात रुजू झाला होता. तो सशस्त्र्ा पोलीस दल (एल ए 4) येथे कार्यरत होता. शुक्रवारी सकाळी निखिलचा मित्र हा त्याच्या घरी गेला होता, मात्र निखिलच्या बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याच्या मित्राने बेडरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा निखिलने गळफास लावून आत्महत्या केली होती. निखिलला तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच कांजुरमार्ग पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली नाही. बँकेचे कर्ज झाल्याने निखिलने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



























































