
सामना प्रतिनिधी, नळेगाव
नळेगाव येथील जनावरांचा बाजार हा लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री होते पण या बाजारातील गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात परराज्यात होत असून पोलीस यंत्रणा याकडे डोळेझाक करत आहे. नळेगाव येथून वाहनाद्वारे गोवंशाची तस्करी कर्नाटक आंध्र मध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन दीड-दोन वर्षे लोटली असली तरीही तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे प्रभावी अंमलबजावणी होत नाही . नळेगाव येथील मंगळवारच्या बाजारातून कमीत कमी 15 आयशर, त्यात प्रत्येक आयशर मध्ये पंधरा ते वीस गायी-गुरं कोंबून तस्करी होत आहे. यातील सर्व आयशर टेम्पो हे कर्नाटक ,आंध्रा ,तेलंगणा या राज्यातील आहेत. नळेगाव येथून आयशर टेम्पो शिरूर आनंतपाळ, उदगीर, चाकूर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो पण यावर काहीच कारवाई होत नाही.
गुरांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने वाहनांमध्ये खचाखच भरून वरून ताडपत्री टाकून कोणाला दिसू नये याची खबरदारी घेण्यात येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.






























































