पुणे – औंधमध्ये चोरट्यांनी 5 फ्लॅट फोडले, चोरट्यांकडील शस्त्र पाहून बीट मार्शल मागे सरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी औंधमधील सिद्धार्थनगरातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 5 बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. त्यानंतर स्थानिकांनी कंट्रोलला केलेल्या फोननुसार तत्काळ घटनास्थळी पोहोचलले दोन बीट मार्शल चोरट्यांच्या शस्त्राला पाहून मागे सरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे.

गोविंद हिरामन यादव (वय 44) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काल मध्यरात्री तीनच्या सुमारास चार चोरटे औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये शिरले. त्यांनी इमारतीचा सुरक्षारक्षक गोविंदला मारहाण करीत चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर दोन चोरट्यांनी कटरच्या साह्याने फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्यामुळे सोसायटीतील एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर घटनास्थळी तत्काळ बीट मार्शलांनी धाव घेतली. मात्र, हातात चाकू घेऊन इमारतीतून खाली उतरलेल्या चोरट्यांना पाहून बीट मार्शल मागे सरले. सीसीटीव्हीमध्ये घटनेचे चित्रीकरण झाले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडे होते एसएलआर पिस्तूल

औंध परिसरात भांडणाचा कॉल मिळाल्याने घटनास्थळी दुचाकीवर दोन बीटमार्शल पोहोचले होते. त्यांच्याकडे एसएलआर पिस्तूल असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, बीट मार्शल दुचाकीवर असतानाच चोरटे अचानक हातात शस्त्र घेऊन पोलिसांच्या दिशेने आले. त्यामुळे एक कर्मचारी दुचाकीवरून खाली उतरला. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचे दुचाकी मागे घेण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना चोरट्यांना पकडण्यासाठी वेळ मिळाला नाही.

औंधमधील शैलेश टॉवर परिसरात भांडण झाल्याचा कॉल बीट मार्शलांना मिळाला होता. त्यानुसार घटनास्थळी तत्काळ बीट मार्शल पोहोचले असता, अचानक इमारतीतून चोरटे हातात चाकू घेउन आल्याचे दिसले. त्यामुळे बीट मार्शलांकडे पिस्तूल असतानाही त्यांना प्रतिकार करण्यास वेळ मिळाला नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे.

– नम्रता पाटील, प्रभारी पोलीस उपायुक्त झोन चार