सायबर ठगाकडून पोलिसाची फसवणूक

सायबर ठगाने पोलीस शिपायाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात ते ड्युटीला होते तेव्हा त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. खात्यातून पैसे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली. खात्याचा वापर करून खरेदी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा तक्रारदार यांनी आपण खरेदी केली नसल्याचे बँक कर्मचाऱ्याला सांगितले. सायबर ठगाने बँकिंग माहिती प्रणालीचा वापर केला. वापर करून दोन मोबाईल ऑर्डर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ज्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोबाईलची खरेदी झाली आहे, त्याचा पोलिसांनी तपशील मागवला आहे. तसेच ते व्यवहार ब्लॉक करण्यासाठी बँकेला पोलिसांनी विनंती केली आहे. आयपी अ‍ॅड्रेसवरून पोलीस शोध घेत आहेत.