
सामना प्रतिनिधी । धुळे
महापालिका निवडणुकीत इच्छुकांनी एकूण 739 उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेकांनी एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त तर काहींनी निरनिराळ्या प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननी आणि माघारीअंती यातील जवळपास दोनशेवर उमेदवार राहतील. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची नावे सोपविली आहेत. त्यात शिवसेनेचे 50 उमेदवार आहेत. भाजप आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाच्या झेंड्याखाली सर्व 74 जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. पण, दोन जागांसाठी या दोन्ही पक्षात मतभेद आहेत. राष्ट्रवादीने 53 जागांवर तर काँग्रेसने 23 जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपने 62 जागांवर उमेदवार दिले आहेत. पण, अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून गुप्तता पाळली जात आहे. सहाजिकच माघारीअंती प्रमुख राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार कोण, हे स्पष्ट होईल.
धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 20 नोव्हेंबरला दुपारी तीनला संपला. निर्धारीत कालावधीत 739 अर्ज दाखल झाले. अनेकांनी एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त तर काहींनी निरनिराळय़ा प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्जाची संख्या मोठी दिसते. महापालिकेच्या सर्व 74 जागांसाठी भाजपच्या प्रदेश आणि स्थानिक पातळीवर नेत्यांशी तात्त्विक मतभेद झाल्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी सर्व 74 जागांवर उमेदवार दिले आहेत. परंतु, आमदार गोटेंसारखी कामगिरी कोणत्याही राजकीय पक्षाला करता आलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 53 उमेदवार दिले आहेत. तशी नावेच त्यांनी जाहीर केली. त्याचवेळी काँग्रेसने मात्र 23 जागांवर उमेदवार दिल्याचा दावा केला आहे. थोडक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन जागांबाबत वादविवाद आहे. माघारी अंती कदाचित दोघापैकी एका पक्षाचे दोन जगांवर किंवा तडजोडी अंती प्रत्येकी एका जागेवर माघार घ्यावी लागेल.
भाजपने 62 उमेदवार दिल्याचे जाहीर केले आहे. पण नावे मात्र स्पष्ट केलेली नाहीत. शिवसेनेने 50 उमेदवार दिले असून त्यांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वीच्या तुलनेत यावेळी शिवसेनेने जास्त उमेदवार दिले आहेत. काही उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात दगा फटका केला. पण, मतदार त्यांना धडा शिकवतील. शिवसेनेने सामान्यांसाठी नेहमीच संघर्ष केला. त्यामुळे जनता मतांचे दान शिवसेनेलाच देईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आमचा संघर्ष असल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या दहा वर्षापासून महापालिकेच्या सत्तेत आहे. गेल्या दहा वर्षात शहराच्या अनेक भागातील रस्ते साकारण्यात आले. जलवाहिन्या टाकण्यात आल्या. ठिकठिकाणी उद्याने साकारण्यात आली. पाणी पुरवठय़ासाठी 136 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना मंजुर करण्यात आली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करायचा म्हणून शहराचे आमदार आणि खासदारांनी पाणी योजनेला हेतुतः विरोध केला. पाण्याच्या सुविधेपासून आमदार-खासदारांनी लोकांना दूर ठेवले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी गुंडगिरीचे समर्थन करतात. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस भरघोस यश मिळवेल, असा दावा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केला.
संजय बोरसे यांना भाजपने उमेदवारी नाकारली
भाजपशी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्ण काम करणारे संजय बोरसे यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. पक्ष संघटनवाढीसाठी काम करणाऱ्या संजय बोरसेसारख्या सक्रिय व्यक्तीला पक्ष उमेदवारी नाकारत असेल तर इतर कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार नाही, असे म्हणत उमेदवार निवडणाऱ्या समितीचा अनेक कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. देवपुरातील पूर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सोपविले आहेत.
काँग्रेसमध्येही धुसफूस
महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी कुणालाही विश्वासात घेतलेले नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. करनकाळ यांच्या मुलाचे पक्षात कुठलेही योगदान नाही तरीही युवराज करनकाळ मुलास उमेदवारी देत आहेत. अनेक वर्ष पक्षात प्रामाणिक काम करणाऱ्या आणि सत्ताधाऱयांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना उमेदवारी नाकारली आहे. युवराज करनकाळ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतरांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस प्रभा परदेशी आणि युवक काँग्रेसचे निलेश काटे यांनी केली.


























































