पवई आयआयटीत प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी 177 विद्यार्थ्यांची नियुक्ती

999

पवई येथील आयआयटी मुंबईत 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी नामांकित कंपन्यांकडून 177 विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली. 32 विद्यार्थ्यांना परदेशातील नोकर्‍यांच्या ऑफर्स मिळाल्या. त्यातील सर्वाधिक ऑफर्स जपानी कंपन्यांकडून मिळाल्या आहेत.

पहिल्या दिवशी प्लेसमेंटमध्ये 35 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. देशांतर्गत नोकर्‍यांच्या सर्वाधिक ऑफर्स क्वालकॉम, मायक्रोसॉफ्ट, गुगल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि टेक्सास इस्ट्रुमेंट या कंपन्यांकडून मिळाल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोकर्‍यांच्या ऑफर्स देण्यात जपानी कंपन्या आघाडीवर राहिल्या. जपानची होंडा, सोनी आणि एनईसी, अमेरिकेची मायक्रोसॉफ्ट, नेदरलॅण्डची ऑप्टीव्हर आणि तैवानची तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) या कंपन्यांनी परदेशातील नोकर्‍यांसाठी 32 विद्यार्थ्यांची निवड केली.

आज प्लेसमेंटच्या दुसर्‍या दिवशी 21 कंपन्यांनी विविध क्षेत्रांतील 100हून अधिक नोकर्‍यांच्या ऑफर्स दिल्या. त्यात परदेशातील ऑफर्स जपानच्या सिसमेक्स कॉर्पोरेशन आणि मुराता तसेच नेदरलँडची फ्लो ट्रेडर्स या कंपन्यांकडून देण्यात आल्या. येत्या दिवसांत आणखी कंपन्या या प्लेसमेंटमध्ये येतील आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक ऑफर्स देतील, असा विश्वास आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलने व्यक्त केला.  

आंतरराष्ट्रीय ऑफर्स

होंडा जपान   – वार्षिक 82 लाख येन (सुमारे 53 लाख 75 हजार रुपये)

सोनी जपान वार्षिक 78.63 लाख येन (सुमारे 51 लाख 55 हजार रुपये)

एनईसी जपान वार्षिक 43.28 लाख येन (सुमारे 28 लाख 39 हजार रुपये)

टीएसएमसी तैवान   वार्षिक 17.96 लाख तैवानी डॉलर्स (सुमारे 42 लाख 20 हजार रुपये)

आपली प्रतिक्रिया द्या