प्रबोधनकार डॉट कॉमचे लोकार्पण, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे ते ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पत्रकार, समाजसुधारक आणि फर्डे वक्ते केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. 17 सप्टेंबर 2010 रोजी प्रबोधनकारांच्या 125 व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले होते. आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रबोधन प्रकाशनचे हे संकेतस्थळ नव्या स्वरूपात आणले जात असून त्याचे लोकार्पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्या (रविवार) सायंकाळी 7.30 वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात हा सोहळा होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक प्रबोधन प्रकाशन आणि ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे संपादक सचिन परब यांनी दिली.

नव्या स्वरूपातील संकेतस्थळ सोशल मीडिया आणि मोबाईल फ्रेंडली असेल.

प्रबोधनकारांचे समग्र साहित्य या संकेतस्थळावर एका क्लिकवर उपलब्ध होणार.

प्रबोधनकारांची सर्व पुस्तके, पुस्तकबद्ध न झालेले साहित्य, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, त्यांनी पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना असा साहित्यखजाना संकेतस्थळावर असेल.

स्थळ

शिवाजी मंदिर, दादर

वेळ

सायंकाळी 7.30 वाजता.