
सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे, ज्याचा वापर करून आपण एका रात्रीत प्रसिद्ध होऊ शकतो. त्यासाठी चांगल्या विचारांना कल्पकतेची जोड आवश्यक आहे. प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांनी याच कल्पकतेच्या जोरावर हटके कामगिरी करून दाखवली आहे. मायलेकाची जोडी इन्स्टाग्रामवर कॉमेडी व्हिडीओ बनवतात. लाखो फॉलेअर्स असणाऱया प्रज्ञा कदम यांचा सामान्य गृहिणी ते यूटय़ूबर स्टार असा प्रवास प्रेरणादायी आहे.
मालाड येथे राहणाऱया प्रज्ञा कदम या गृहिणी आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा मुलगा प्रथमेश कदम याने वेगळे पाऊल उचलले. प्रथमेशने आईला हसवण्यासाठी तिच्यासोबत काही कॉमेडी व्हिडीओ बनवले आणि इन्स्टाग्रामवर रील स्वरूपात शेअर केले. बघता बघता दोघांचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.
याविषयी प्रथमेशने सांगितले, सुरुवातीला आम्ही ‘टिकटॉक’वर व्हिडीओ बनवायचो. पुढे ‘टिकटॉक’ बंद झाले आणि आमचे व्हिडीओही बंद झाले. मे 2020 मध्ये माझ्या बाबांचे निधन झाले. त्यामुळे आई सतत दुःखी असायची. तिला सावरण्यासाठी पुन्हा मनोरंजनाकडे वळावं असं मी ठरवले. लॉकडाऊनच्या काळात मी घरी होतो, पण शांत बसलो नव्हतो. कॉमेडी पंटेन्ट लिहीत होतो. त्याचदरम्यान डान्स क्लासच्या पैशांतून आयपह्न घेतला, जेणेकरून व्हिडीओचे शूटिंग चांगल्या दर्जाचे होईल. बाबांना जाऊन वर्ष झाल्यानंतर मी आणि आईने इन्स्टाग्रामवर रील अपलोड करायला सुरुवात केली. सुरुवातीला एक- दोन कॉमेडी रील बनवल्या. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. एका महिन्यात आमचे एक लाख फॉलोअर झाले.
काकू तर लाजवाब…
प्रथमेश पुढे म्हणाला, तो कोविड काळ होता. लोक घरी होते. आमच्या लहान व्हिडीओंमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले. कधी कधी आम्ही लाईव्ह करायचो. त्यावेळी डॉक्टर, नर्स, रुग्ण सहभागी व्हायचे. ते सांगायचे, तुमच्यामुळे आमच्या चेहऱयावर हसू फुलतंय आणि काकू तर लाजवाब आहेत. एका कोविड रुग्णाने सांगितले की, तुमचे व्हिडीओ बघून मी एक-एक दिवस काढला. लोकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे आमचा उत्साह वाढत गेला.
गाणी–वेब सीरिजची ऑफर
प्रज्ञा कदम आणि प्रथमेश कदम यांना आता वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. इव्हेंटनाही त्यांना लोक बोलावू लागले आहेत. प्रज्ञा यांचे एक, तर प्रथमेश यांची दोन गाणी आली आहेत. एका गाण्यात ते दोघे प्रथमच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. सुरुवातीला आम्ही स्वतःच्या आनंदासाठी व्हिडीओ बनवली. कधी लाईक्स वगैरे बघितल्या नाहीत. त्याला पुढे एवढे यश मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती, असे प्रज्ञा यांनी सांगितले.





























































