34 हजार कोटींची कर्जमाफी ही धुळफेक – शेतकरी नेते पोहरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शेतकर्‍यांचे भले करण्यासाठी शासनाने कर्जमाफी आणली परंतु ही कर्जमाफी किती शेतकर्‍यांना मिळाली हा संशोधनाचा भाग आहे. बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शासनाने ओटीएस केले असून ओटीएसचा अर्थ एकदा पैसे भरणे आणि बँकापासून दूर होणे असा आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकर्‍यांना बँकेकडून कर्ज मिळणे नाही. कर्जमाफी ही शुध्द धुळफेक असल्याचे प्रतिपादन शेतीप्रश्नांचे गाढे अभ्यासक शेतकरी नेते व संपादक प्रकाश पाहेरे यांनी पिकविमा, पिककर्ज शेतकरी संवाद मेळाव्यात केले. तर शिवसेनेच्या अडचणीच्या काळात अनेकांनी पक्ष सोडले. भुजबळ, राणे, राज ठाकरे यांच्या काळात जिल्ह्यातही फुट पडली. पक्ष अडचणीत असतांना आपण पक्षासोबत कायम राहिलो. त्यामुळे आपल्या अडचणीच्या काळात पक्ष आपल्या सोबतच राहील असा विश्वास आयोजक माजी आमदार विजयराज शिंदेंनी व्यक्त केला. राजे गार्डन, विष्णुवाडी येथे रविवारी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या संकल्पनेतून पिकविमा, पिककर्ज, शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे प्रकाश पोहरे म्हणाले, 2014 मधे केंद्र आणि राज्य सरकारने जे चित्र उभे केले ते पहाता शेतकरी वर्गास अच्छे दिन येतील असे वाटत होते. परंतु 2014 ची शेती गाजराची होती. या काळात शेती विषयक ध्येय धोरणं व्यवस्थित राबविली असती तर शेतकरी आत्महत्या पटीत वाढल्या नसत्या. शेतमालाला भाव नाही, रोजगारांना काम नाही, विज वाया जात आहे. पण शेतकर्‍यांना द्यायची नाही असे धोरण आहे. त्या विरोधात शेतकरी आणि युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

रामाचाही वनवास संपलाच- विजयराज शिंदे
रामाला वनवासात जावे लागले. जिथे रामालाही वनवास सुटला नाही तिथे आपली अवस्था काय? परंतु वनवास संपल्यानंतर रामाने राज्य केले आहे. आपलाही पाच वर्षाचा राजकिय वनवास संपला आहे. येणारा काळ आपला असून आपण लढणार लढणार आणि जिंकणार असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाचे आयोजक विजयराज शिंदे यांनी केले.