प्रशांत दामलेंना सारखं काही तरी होतंय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘हल्ली ना, सारखं काहीतरी होतंय…काय होतंय ते कळत नाहीये. कळलं तर सांगता येत नाहीये… सांगता आलं तर पटत नाहीये’’ असं म्हणत काही दिवसांपूर्वी अभिनेते प्रशांत दामले यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. अखेर या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. सोमवारी प्रशांत दामले यांनी आपल्या नव्याकोऱ्या नाटकाची घोषणा केली आहे. ‘सारखं काहीतरी होतंय’ असे या नाटकाचे नाव आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. संकर्षणने या नाटकाचा प्रोमो शेअर करत म्हटलंय, ‘जबाबदारी मोठी आणि वेगळी आहे. आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या.’ नाटकाच्या प्रोमोमुळे आतापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोमध्ये प्रशांत दामले, वर्षा उसगावकर आणि संकर्षण कऱ्हाडे झळकत आहेत.

36 वर्षांनंतर मी आणि वर्षा उसगावकर पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय, ‘सारखं काहीतरी होतंय’ हे आमचं नवकोरं नाटक लवकरच भेटीला. 

– प्रशांत दामले, अभिनेते