सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रतीक पाटील यांचा पक्षाला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सांगली

लोकसभा उमेदवारीवरून स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची, तर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वसंतदादा घराण्याच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

सांगलीच्या लोकसभा उमेदवारीवरून गेले काही दिवस जिह्यातील काँग्रेसमध्ये खदखद सुरू होती. या खदखदीतून आज वसंतदादाप्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा वसंतदादा समाधीस्थळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला वसंतदादाप्रेमी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

संपूर्ण राज्याच्या उमेदवारीचा निर्णय यापूर्वी सांगलीतून व्हायचा; पण उमेदवारीसाठी आज जिह्याची अवस्था पाहता काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती राहिली नाही. काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम करून वसंतदादांच्या नावे सामाजिक कार्य करणार असल्याची घोषणा प्रतीक पाटील यांनी या वेळी केली.

स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला वसंतदादा घराण्याने अबाधित ठेवला; परंतु सांगली लोकसभा उमेदवारीवरून पक्षश्रेष्ठाRनी चालवलेला प्रकार वसंतदादाप्रेमी कार्यकर्ते सहन करू शकत नाही. पक्षाने कुणाला उमेदवारी द्यायची त्यांना देवो, पण वसंतदादांचा हा वारसदार तुमच्या प्रेमाखातर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास तयार असल्याचे विशाल पाटील यांनी जाहीर करून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली. वसंतदादा घराण्यानेच ही निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.