नालेसफाईचे निम्मे काम फत्ते! शहर, उपनगरांतील 50 टक्के काम पूर्ण, या वर्षी दुप्पट गाळ काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत असताना पावसाळापूर्व कामेही वेगाने सुरू आहेत. यामध्ये नालेसफाईचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. या वर्षी नाल्यांसह मिठी नदीमधील दुप्पट गाळ काढण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. मोठय़ा प्रमाणात गाळ काढल्याने अतिवृष्टीत मुंबईकरांना मनस्ताप होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई महानगरपालिका गेल्या वर्षभरापासून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यासाठी पालिकेने संपूर्ण यंत्रणा कामाला लावून जानेरवारीअखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने पावसाळापूर्व कामांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रणा वेगाने काम करीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. या वर्षीच्या नालेसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामध्ये शहरातील ब्रिटिशकालीन नाल्यांची सफाई करण्यासाठी स्वयंचलित रोबाटिक सीसीटीव्ही पॅमेरा सोडून पाहणीनुसार काम केले जात आहे. तर मिठी नदीच्या सफाईसाठी नदीच्या खोल भागात जाऊन समान पातळीवर गाळ काढण्यासाठी नेदरलँडची टक्शर एम्फिबिअस मशीन तर  नदीच्या कानाकोपऱयात जाऊन तरंगता कचऱयाची सफाई करणारी स्विडनची सिल्ट पुशर मशीन वापरली जात आहे.

असा काढला गाळ

शहरातील नाल्यांमधील 40263.96 मेट्रिक टन गाळ काढण्याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 39.71 टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्व उपनगरातील 96907.73 मेट्रिक टन गाळापैकी 51.29 टक्के तर पश्चिम उपनगरातील 170626.93 मेट्रिक टन गाळापैकी 49.94 टक्के गाळ काढण्यात आला आहे. तर मिठी नदीमधील 28 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

असे होतेय काम

  • मुंबईच्या एकूण 100 टक्के नालेसफाईपैकी 75 टक्के काम पावसाळ्याआधी, 10 टक्के पावसाळ्यात आणि 15 टक्के काम पावसाळ्यानंतर करण्यात येते.
  • मुंबईत दरवर्षी 10 एप्रिलला नालेसफाईचे काम सुरू केले जाते. मात्र यावर्षी एक महिना आधीच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच नालेसफाईला सुरुवात करण्यात आली.