जिंतूर येथे मुख्याध्यापकाने केली शिक्षकास धक्काबुक्की

55
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । जिंतूर

तालुक्यातील भोसी या गावात जिल्हा परिषदचे इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षण विभागाने एकूण 9 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या सर्व शिक्षकांचे जून महिन्याचे पगार रखडले असून जुलैचा पंधरवडा उलटून गेला तरी पगार मिळत नसल्याने शिक्षक संतापले आहेत. शाळेतील शिक्षक जी.एस. गव्हाणे, एच.बी. रन्हेर, डी.डी. शेळके, आर.पी. साबळे, डी.एस. डाखोरे यांनी मुख्याध्यापक एम.आर. सोन्नेकर यांच्याकडे पगाराची मागणी केली. पगाराबाबत विचारपूस केली म्हणून मुख्याध्यापक एम.आर. सोन्नेकर यांनी शिक्षक रन्हेर यांच्या शर्टची कॉलर पकडून उद्धट भाषेत त्यांच्याशी शाळेतील कार्यालयात गैरवर्तन केले. या प्रकाराचा व्हिडीओही समोर आला आहे.

सदरील मुख्याध्यापक मागील अनेक दिवसांपासून शाळेतील शिक्षकांशी गैरवर्तन करीत व असभ्य भाषेचा वापर करीत असल्याचा प्रकार समोर आले आहेत.. याबाबत अनेकवेळा शालेय व्यवस्थापन समितीने तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करून शाळेला भेट देऊन सदरील मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकाचा प्रताप पाहूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई मुख्याध्यापकावर केली नाही तर मागील चार ते पाच दिवसांपूर्वी परभणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन सदरील प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षकांकडून घेतली होती. त्यानंतरही या मुख्याध्यापक सोन्नेकर यांच्यावर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्याध्यापकाचे शाळेतील असभ्य वर्तन व शाळेतील व्यवस्थापन पाहता मुलांनी कुठले ज्ञान या शिक्षकांकडून आत्मसाद करावे ? असा प्रश्न आता पालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांकडून सदरील मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशा मुजोर मुख्याध्यापक एम.आर. सोन्नेकर यांच्यावर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या