लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसचा मोठा डाव, भाजपला टक्कर देणार प्रियांका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोठा राजकीय डाव खेळताना प्रियांका गांधी-वढेरा यांना पक्षाच्या सक्रिय राजकारणात उतरवले आहे. प्रियांका यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. हा निर्णय म्हणजे काँग्रेससाठी नव्या युगाची चाहूल असून भाजपला आता प्रियांका टक्कर देणार, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. दरम्यान, भाजपकडून प्रियांका यांच्या नियुक्तीवर टीका होत असून काँग्रेसने मात्र हा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या आणि अध्यक्ष राहुल गांधी यांची बहीण म्हणून प्रियांका गांधी-वढेरा यांनी आजवर उत्तर प्रदेशातील अमेठी व रायबरेली या दोन मतदारसंघांमध्ये लक्ष केंद्रित करून तेथे काँग्रेसचा प्रचार केला होता. प्रियांका यांनी पक्षात सक्रिय व्हावे अशी भावना काँग्रेसमधील अनेकांची होती. तशी मागणीही अनेकदा केली गेली. मात्र प्रियांका यांनी स्वतःचे लक्ष अमेठी आणि रायबरेलीपुरते मर्यादित ठेवले. आज काँग्रेसने अधिकृतरीत्या प्रियांका गांधी-वढेरा पक्षात सक्रिय झाल्याची घोषणा केली. प्रियांका यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करताना त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची (पूर्वांचल) जबाबदारी देण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशच्या इतर भागाची जबाबदारी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी गुलाम नबी आझाद असणार आहेत.

काँग्रेसची खेळी
देशातील सर्वाधिक 80 खासदार उत्तर प्रदेशातून निवडून येतात. 2014च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचे तब्बल 71 खासदार निवडून आले होते, तर काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. अमेठी आणि रायबरेलीत फक्त काँग्रेस विजयी झाली होती. मात्र आता काँग्रेसने प्रियांका गांधी-वढेरा यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देऊन मोठा राजकीय डाव खेळला आहे.

काही लोकांसाठी परिवारच पक्ष – मोदी
प्रियांका गांधी-वढेरा यांची काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीक्र प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी प्रियांका यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्रातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. आमचा विरोध काँग्रेस संस्कृतीला आहे. काँगेसमुक्त देश याचा अर्थ काँग्रेसमुक्त संस्कृती असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी फेल झाल्यामुळे प्रियांकाला आणले – भाजप
राहुल गांधी हे नापास झाल्यामुळे काँग्रेसला प्रियांका यांचा आधार घ्यावा लागला आहे. राहुल गांधी फेल झाल्याची ही जाहीर कबुलीच आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

बॅकफूटवर नाही, तर फ्रंटफूटवर खेळणार – राहुल गांधी
आम्ही बॅकफूटवर नाही, तर फ्रंटफूटवर खेळणार आहोत. त्यासाठी प्रियांका यांच्या नियुक्तीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली आहे. अमेठीत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, प्रियांका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना दोन महिन्यांसाठी उत्तर प्रदेशात पाठविले नाही. काँग्रेस पुन्हा बळकट करण्यासाठी ते उत्तर प्रदेशात काम करतील. भाजपने उत्तर प्रदेशला उद्ध्वस्त केले आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला सत्तेवर आणून खूप वेळ वाया घालविला, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात सपा-बसपासोबत चर्चेची दारे खुली ठेवणार आहे. मायावती आणि अखिलेश यांनी आम्हाला आघाडीत समाविष्ट केले नाही. पण त्यांच्याविषयी तिरस्कार नाही, प्रेम आहे. आम्ही तिघेही भाजपला हटविण्यासाठी लढत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.