
दोन दिवसांत काय होईल सांगता येत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सस्पेन्स वाढवला. पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही, असे पवार म्हणाले. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आग्रही दिसत आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत होईल, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही, असेही पवार पुढे म्हणाले.
भाजप आमदार मुटकुळेंचा आरोप, संतोष बांगर यांनी 50 खोके घेतले
भाजपचे हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर थेट आरोप केला. संतोष बांगर 50 कोटी घेऊन शिंदे गटात गेले होते. ते केवळ पैशाचे भुकेले आहेत. त्यांना आजही गावखेडय़ात ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ म्हणूनच ओळखले जाते.बांगर कधीही महायुतीतील सहकारी नव्हते. ते हिस्ट्रीशिटर आहेत, असा हल्ला मुटकुळे यांनी केला.
मालवणात निलेशची रेड, सिंधुदुर्गात राणे आणि भाजपात किलेश
शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणात भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरावर रेड टाकून 25 लाखांची पॅश असलेली बॅग पकडल्यानंतर सिंधुदुर्गात राणे आणि भाजपात किलेश वाढला आहे. रवींद्र चव्हाण आल्यावर असे प्रकार घडतात, असे निलेश म्हणाले. तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी हमाम मे सब नंगे होते है, असे प्रत्युत्तर त्यावर दिले.
2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे!रवींद्र चव्हाणांचे संकेत
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जळगावात माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला. ते पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न करत होते पण नंतर गाडीची काच खाली घेऊन ते बोलले. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. त्यानंतर मी बोलेन. नीलेश राणे खोटे बोलत आहेत, एवढेच बोलून ते निघून गेले. या विधानाने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.




























































