
विजय जोशी । नांदेड
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात नसलेल्या समन्वयामुळे ७० टक्के नांदेड शहरात चिखलाचे साम्राज्य झाले असून, १५ दिवसापूर्वीच एक दिवसआड पाणी पुरवठ्याची घोषणा करणाऱ्या प्रशासनाचे मात्र हसे झाले आहे. शहरातील काही भागात दोन दिवसाआड तर काही भागात तीन दिवसाआड पाणी आजही येत असल्याचे दिसून येते.
नांदेड शहराच्या महानगरपालिकेला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर या शहराचा विकास होईल तसेच सर्वसामान्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, नाले, ड्रेनेज व दिवाबत्ती या समस्या सुटतील असे नागरिकांना वाटत होते. मात्र निवडणुका झाल्यानंतरच्या दहा महिन्याच्या काळात नवे कुठलेही प्रकल्प मार्गी लागलेच नाही, उलट आहे त्या शहराच्या समस्या वाढत गेल्या. मनपाच्या सत्तेतील चेहरे बदलले मात्र त्यांना आपल्या वेगळ्या खुबीने काम करवून घेणारे मोहरे अर्थात विविध विभागातील अधिकारी त्याचठिकाणी असल्याने पदाधिकारी देखील हतबल झाले आहेत.
२००८ साली नांदेड शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी आल्यानंतर पाणी पुरवठा, मलनिस्सारण या प्रकल्पासाठी शहरातील १२२ वस्त्या खोदून काढण्यात आल्या. पाणी पुरवठा व्यवस्थित होईल, मलनिस्सारणाची सोय होईल, यादृष्टीने नागरिकांनी देखील काही गोष्टी सहन केल्या. अगोदर रस्ते का खड्डे किंवा मलनिस्सारणाची पाईपलाईन का ड्रेनेज लाईन या विवंचनेत मनपा अधिकारी असतानाच २०१८ साली देखील हिच परिस्थिती आहे. अगोदर रस्ते तयार करायचे, त्यानंतर सहाच महिन्यात तेच रस्ते फोडायचे, पाईपलाईन टाकण्याचे निमित्त करायचे, कंत्राटदाराकडून हे दुरुस्त करुन घेण्याची रक्कम जमा करुन घ्यायची. प्रत्यक्षात ते दुरुस्तच करायचे नाही, अशा कालचक्रात नांदेडकर अडकले आहेत. दोनच महिन्यापूर्वीच या शहरातील चौकांचे सुशोभिकरण आणि रस्त्यांच्या डागडुजीसाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिली. शहरात या पावसाळ्यात अजून कुठलीही अतिवृष्टी झाली नसताना नांदेडकर मात्र खड्ड्यांचा सामना करत आपले जीवन जगत आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्या अशा जवळपास मुख्य रस्त्यावरील दिडशे फुटांचे ड्रेनेजची झाकणे उघडी असल्याचे बोलके चित्र दिसून येत आहे.
पाणी पुरवठ्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाल्याने नांदेडकरांना एक दिवसआड पाणी देण्याची घोषणा मनपा प्रशासनाने केली. पदाधिकाऱ्यांनी तर दररोज पाणी सोडा, असा हट्टाहास धरला. मात्र यंत्रणेकडे तांत्रिक अडचणी असल्याने एक दिवसआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सामनाने यासंदर्भात वस्तूस्थिती मांडून तांत्रिकदृष्ट्या एक दिवसआड पाणी देखील सोडणे अशक्य असल्याचे म्हंटले होते. झालेही तसेच, पुरेशा पाणी टाक्या नसल्यामुळे नांदेडच्या तरोडा, वर्कशॉप, सांगवी, पावडेवाडी, काबरानगर, शिवाजीनगर, गणेशनगर, जुन्या नांदेडचा काही भाग, पिरबुऱ्हाणनगर, देगलूर नाका, वजिराबादचा काही भाग आदी ६० टक्के भागात दोन दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे नांदेडची महापालिका नावालाच असल्याचे दिसून येते.
नांदेड महापालिकेवर एकहात्ती सत्तेचा अंमल झाल्यानंतर या विजयाचे शिल्पकार प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ७३ नगरसेवक निवडून आल्यानंतर आजपर्यंत सहा आढावा बैठका घेतल्या. मात्र या बैठकांचे फलित शून्य असल्याचे दिसून येते. शहरातील समस्या आहेत तशाच प्रलंबित असून, चिखलाच्या साम्राज्याने नांदेडकर मात्र पुरते हैराण आहेत. उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या सर्व प्रश्नांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.






























































