रामदेवबाबांच्या विरोधात वातावरण तापले, योग परंपरेला लांच्छन आणणारे वक्तव्य : डॉ. नीलम गोऱ्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामदेवबाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महिला वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेवबाबांचे वक्तव्य होते, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी निषेध केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी रामदेवबाबांच्या फोटोला जोडय़ाने हाणले.

महिलांनी कपडे घातले नाहीत तरी त्या जास्त सुंदर दिसतात असे वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबा यांनी शुक्रवारी ठाण्यात केले होते. डॉ. नीलम गोऱहे यांनी रामदेवबाबांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

योगासारख्या हिंदुस्थानी परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेवबाबांचे नाव लावणे आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप असल्याचे डॉ. नीलम गोऱहे यांनी नमूद केले आहे. योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. रामदेवबाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणारे असल्याचे निलम गोऱहे यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीसांनी निषेध करायला हवा
मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱया अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजीरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते, असे डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रामदेवबाबांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.