भाजपच्या रावणाने माफी मागितली,खेटराने पूजा सुरूच

सामना ऑनलाईन, मुंबई

‘तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’ असे वक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे भाजप आमदार राम कदम यांच्याबद्दल निर्माण झालेला संताप अधिकच भडकला आहे. कदम यांची राज्यभरात खेटराने पूजा सुरू आहे. आज मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपच्या या रावणाचे पुतळे जाळले गेले. पुतळ्याला जोडय़ाने हाणले गेले. काही ठिकाणी कदम यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला गेला.

राम कदम यांचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. लोकांमध्ये इतका संताप आहे की कदम यांना घराबाहेर ‘कदम’ ठेवणे कठीण झाले आहे. त्यांच्या घराबाहेरही अनेक लोक त्यांना काळे फासण्यासाठी दबा धरून आहेत. राज्यभरात नाक्यानाक्यांवर आणि राजकीय पक्षांबरोबरच महिला संघटनांकडून कदम यांचा निषेध होत आहे.

मुख्यालयासमोर पायदळी तुडवले

आज दक्षिण मुंबईत चर्चगेट येथील भाजपा मुख्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने कदम यांच्याविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली. कदम यांचे बॅनर्स यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवले. कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना भवनसमोरही महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कदम यांच्या पुतळ्याला चपलांनी फटकावून त्यांचा निषेध केला.

मालाडमध्येही आंदोलन

शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने मालाड स्थानक येथे राम कदम यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि महिला विभाग संघटक विशाखा मोरये यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विधानसभा संघटक मधुकर राऊत, संतोष राणे, अजित भंडारी, अनिल भोपी यांच्यासह मालाड, कांदिवली, चारकोप येथील शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी

विरोधी पक्षही राम कदम यांच्यावर भाजपने कारवाई करावी अशी जोरदार मागणी करत आहेत. या प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. कदमप्रकरणी त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कदम यांची ट्विटरवर टिवटिव

राज्यभरातील निषेधाने राम कदम यांचेही धाबे दणाणले आहे. त्यांनी आज सकाळी ‘ट्विटर’वरून महिलांची जाहीर माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली असल्यास   पुनश्च त्यांची मी माफी मागत आहे’ असे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार

दहीहंडी समन्वय समितीनेही आता राम कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार घातला आहे. पुढच्या वर्षीपासून दहीहंडी समन्वय समितीशी संलग्न गोविंदा पथके राम कदम यांच्या दहीहंडीत सहभागी होणार नाहीत.

राम कदम यांची आमदारकी रद्द करावी आणि यापुढे त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी करत शिवसेना विभाग क्रमांक 1च्या वतीने बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वाराबाहेर गुरुवारी आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे आणि विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसंगे, नगरसेविका शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, गीता सिंघण, संध्या दोशी, माधुरी भोईर, नगरसेवक संजय घाडी यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.

आठ दिवसांत जाब द्या – महिला आयोगाचे कदमांना आदेश

महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही याप्रकरणी गंभीर दखल घेऊन राम कदम यांना येत्या आठ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. महिलांबाबत वक्तव्य करताना कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटले होते.

दादर येथील शिवसेना भवनसमोर विभाग क्रमांक 10 च्या महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या पुतळ्याला चपला मारो आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, विभाग संघटक श्रद्धा जाधव, आमदार मनीषा कायंदे, उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर, रचना अग्रवाल, वृषाली पेडणेकर, सुनीता आयरे, आरती किनरे, कीर्ती म्हस्के, कविता जाधव आदी.

महिला भोगवस्तू आहेत का? – शायना एनसी

राम कदम यांच्या विधानाबद्दल भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी संपात व्यक्त केला. भाजपच्याच आमदाराने आवडणाऱ्या मुलीला पळवून नेण्यास मदत करेन, असे सांगणे हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. राम कदम यांच्या या विधानामुळे हिंदुस्थानी पुरुषांची मानसिकता आजही बदललेली नाही, असे मला वाटते. आजही हिंदुस्थानी पुरुष महिलांना भोगवस्तू मानतात. एकीकडे महिलांना समाजात सरस्वती, दुर्गा आणि लक्ष्मी म्हणून पूजले जाते, तर दुसरीकडे घराबाहेर पडलेल्या कोणत्याही महिलेबरोबर पुरुषाने गैरवर्तन करावे आणि त्यातून सुटका करून घ्यावी, हीच मानसिकता दिसते, असे शायना म्हणाल्या.

पक्षानेच जीभ छाटली; चॅनेलवरील बोलती बंद

कदम यांचे भाजप प्रवक्तेपद धोक्यात आले आहे. भाजपने त्यांना कोणत्याही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होऊ नका, तसेच पक्षाच्या कोणत्याही मुद्दय़ाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलू नका असे तोंडी आदेश दिल्याचे समजते.

गोविंदा मंडळांचाही बहिष्कार

दहीहंडी कार्यक्रमातच राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. इतकेच नव्हे तर, त्यांनी अभिनेत्री प्राची देसाईचे डायलॉग ऐकण्यासाठी एका गोविंदा मंडळाला दहीहंडीचे रचलेले थर खाली उतरवण्यास सांगूनही अवमान केला होता. त्यामुळे गोविंदा मंडळांमध्येही त्यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे. दहीहंडी समन्वय समितीने राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात कोणत्याही गोविंदा पथकाने सहभागी होऊ नये असे आवाहन समितीने केले आहे.

जीभ छाटा, पाच लाख मिळवा!

महिलांचा अवमान करणाऱ्या राम कदम याची ‘जीभ छाटा आणि पाच लाख मिळवा’ अशी घोषणा बुलढाण्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. कदम यांच्यावर भाजपनेही कारवाई करावी अशी मागणी केली आहे.