अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात सवर्णांचा बंद

14

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यात केलेल्या दुरुस्तींविरुद्ध आज सवर्णांनी हिंदुस्थान बंद पुकारला. बंदचे तीक्र पडसाद मध्य प्रदेशसह उत्तर हिंदुस्थानात उमटले. बिहार, उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्याने अलर्ट जारी केला. काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. अनेक राज्यांत शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले.

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) अत्याचार प्रतिबंधक कायद्या संदर्भात (अॅट्रॉसिटी +अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी केल्यानंतरच एफआयआर दाखल करावा. या गुन्हय़ात आरोपीला जामीन मिळण्याचा अधिकार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींनी विरोध करीत 2 एप्रिलला हिंदुस्थान बंद पुकारला होता. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला आणि अॅट्रासिटी कायदा ‘जैसे थे’ ठेवण्यात आला. केंद्र सरकारच्या या भुमिकेचा निषेध म्हणून सवर्ण समाजाने गुरुवारी देशव्यापी बंद पुकारला होता. सवर्णांच्या अनेक संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, याबंदचा परिणाम केवळ उत्तर हिंदुस्थानात झाला.

काय घडले?

मध्यप्रदेशात बंदचा सर्वाधिक परिणाम झाला. संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्वाल्हेर, इंदौर, देवास, विदिशा, भिंड, मुरैना, मंदसौर, सागर, उज्जैन, कटनी आदी ठिकाणी रस्तारोको, रेलरोको करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद होत्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, काँग्रेसनेते कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनेक जिल्हय़ात जमावबंदी आदेश लागू केला.

  • बिहारमध्ये पाटणासह अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. पटणा येथे रेल्वे रोखण्यात आली. महामार्गावर टायर जाळून रस्तारोको करण्यात आला.
  • पाटणा येथे भाजप प्रदेश कार्यालयावर आंदोलनकर्त्यांनी धडक दिली. मोदी सरकारविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
  • उत्तरप्रदेशात बलिया येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यात सहा पोलीस जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
  • राजस्थानात जयपूर, उदयपूर, प्रतापगढ, पाली, पिलानी आदी जिल्हय़ात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला होता.
  • पंजाब, हरियाणातही अनेक ठिकाणी बंदचे पडसाद उमटले.
आपली प्रतिक्रिया द्या