
पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संतोष जनार्दन म्हेत्रे (वय – 55) असे मृताचे नाव आहे.
शहरात दिवसेंदिवस कोराना वाढता प्रादुर्भाव चिंताजनक ठरत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
संतोष म्हेत्रे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. ड्युटीवर असताना त्यांना 5 एप्रिलला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, इतर व्याधींमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
































































