
कबड्डीपटू असलेल्या अल्पवयीन मुलीचा नात्यातील मुलाने कोयता आणि चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडीत घडली होती. इथल्या एका लॉन्ससमोर मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा खून झाला होता. एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी हृषिकेश उर्फ शुभम भागवत (वय 21 वर्ष, रा.चिंचवड, मूळ रा.खंडाळा) याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
मंगळवारी घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे परिसरातील लहान मुले आणि नागरिक भीतीपोटी सैरावैरा पळायला लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मैत्रिणींसोबत खासगी लॉन परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी नात्यातील आरोपी शुभमने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी झाली. त्याच रागातून शुभमने सोबत आणलेला कोयत्याने मुलीवर वार केले आणि क्रूर पद्धतीने तिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी घटनास्थळी कोयता आणि खेळण्यातील पिस्तूल टाकून पळ काढला.
खुनाच्या घटनेमुळे परिसरात व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. खून झालेली मुलगी लोन परिसरातील मोकळ्या जागेत मैत्रिणींसोबत स्ट्रेचिंग करत होती. त्यावेळी आरोपी शुभम भागवत याने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार केले. त्यावेळी मैत्रिणींपैकी एका मुलीने आरोपी शुभम च्या हातातील चाकू खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभमच्या डोक्यात सैतान संचारल्याने मुलीवर वार करून खून केला. खुनाचा धक्कादायक प्रकार पाहून मुलींनी आरडाओरडा करत बाजूला पळ काढला.
नात्यातील मुलानेच अल्पवयीन मुलीचा कोयत्यासह चाकूने वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे- नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त झोन 5































































