
पुणे शहर परिसरात वाहनचोऱ्या करणाऱ्या चौघा सराईतांना अटक करून वानवडी पोलिसांच्या पथकाने आरोपींच्या ताब्यातून चोरीची 11 दुचाकी वाहने जप्त केली. चौघे आरोपी रेकॉर्डवरील आहेत. पुण्याच्या बाहेर वाहने विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली.
सुरज श्रीकांत कांबळे, गणेश बबन लोंढे (दोघे. रा. महंमदवाडी रोड), अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने (महंमदवाडी), भिमाशंकर उर्फ भिमा हरिभाऊ लाळगे (रा. महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 11 वाहने जप्त करून वानवडी पोलीस ठाण्याकडील चार, हडपसरमधील दोन, कोंढवा पोलीस ठाण्याकडील दोन व लातुर जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्यातील एक असे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर वानवडी पोलिसांचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते.
यादरम्यान काही संशयीत तरूण चोरीची दुचाकी वाहने जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती अंमलदार सर्फराज देशमुख, निलकंठ राठोड यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्त केली. आरोपींपैकी मॉन्टी माने हा मोक्का गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आलेला आहे. तर, लाळगे हा कोंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, अंमलदार सर्फराज देशमुख, निलकंठ राठोड, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड यांच्या पथकाने केली.



























































