
औंध संस्थानच्या गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या खोट्या सह्या करुन बनावट करारनामा करीत भाडेकरुनने पुणे शहरातील मोक्याच्या टिळक रस्त्यावर असलेल्या जागेची परस्पररित्या विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना विश्रांमबाग पोलिसांनी अटक केली आहे.
शशी शंकर पोडवाल (वय 59, रा. आळंदी रस्ता, येरवडा) आसिफ जलील खान (वय 61, रा. मार्केटयार्ड ) आणि अन्वर युनूसखान पठाण (वय 54, रा. गोखलेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बलराज अरुण वाडेकर (वय 37, रा. गुरुवार पेठ ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पुण्यातील टिळक रस्त्यावर मालकीची जागा आहे. त्याठिकाणी पोटभाडेकरु म्हणून संस्थानने आसिफ खान आणि अन्वर पठाणला जागा दिली होती. काही दिवसांनी आसिफ आणि अन्वरने संगनमत करुन जागेचा बनावट करारनामा केला. त्यावर गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी आणि त्यांच्या मुली चारुशिला राजे भगवंतराव पंतप्रतिनिधी व हार्षिताराजे भगवंतराव पंतप्रतिनिधी यांचे फोटो लावून खोट्या सह्या केल्या. त्यानंतर ही जागा शशी पोडवाल यांना विकण्यासंदर्भात व्यवहार केला. जागा औंध संस्थानच्या गायत्रीदेवी यांची असतानाही आसिफने बनावट सह्या करुन फसवणूक केली आहे.
”खोट्या सह्या आणि बनावट दस्ताऐवज तयार करुन आरोपींनी औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मालकीची जागा विकण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.” – बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे




























































