
नियमबाह्य पद्धतीने सुरू राहणार्या शहरातील 28 नामांकित ‘रूफ टॉप’ हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित हॉटेलमालकांवर उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विभागीय गुन्हे नोंदवून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मंजूर नकाशाव्यतिरीक्त अन्य ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले आहे.
उत्पादन शुल्क विभागातर्फे भरारी पथकांची नेमणूक करून शहरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत शहर परिसरातील अलिशान अशा ‘रुफ टॉप’ बारवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात उंच अशा व्यावसायिक इमारतींवर अलिशान पद्धतीने ‘रुफ टॉप’ बार चालविले जातात. त्यांना परवाना देताना नियम घालून देण्यात आलेले असतात. याअंतर्गतच मंजूर नकाशाव्यतिरीक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही, मात्र अनेकजण परवाना कक्षाच्या बाहेर व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अशाप्रकारे परवाना कक्षाबाहेर अवैधरित्या व्यवसाय करणार्या 28 ‘रूफ टॉप’ हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये बाणेरमधील ट्रम्प व्हेंचर्स एजंट जॅक्स, कल्याणीनगरमधील नारंग व्हेंचर्स, खराडीतील एम अॅण्ड एम हॉस्पिटॅलिटी, हॉटेल टू डॉट्स, सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल एजंट जॅक्स, कोथरूडमधी हॉटेल न्यूट्रीप्रिझम, कॅम्पातील हॉटेल कलेक्टीव्हीटी, महंमदवाडीतील पंजाबी बाय नेचर, विमाननगरमधील अरोरा हॉस्पिटॅलिटी, कोरेगा पार्कमधील हॉटेल लेमनग्रास एलएलपी, हॉटेल संस्कृती आदी हॉटेलचा समावेश आहे. संबंधीत अस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उप अधिक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
नियमबाह्य 28 आस्थापनांवर कारवाई
हॉटेल, रूफटॉप अस्थापनांची तपासणी करून नियमबाह्य पद्धतीने सुरू असणार्या 28 अस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
– चरणसिंह रजपूत, अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

























































