पैशांच्या वादातून प्रेयसीवर चॉपरने वार, पोलिसांचीही केली दिशाभूल; पुण्यात तरूणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

प्रेयसीला जेवण्याच्या बहाण्याने एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सासवड रस्त्यानजीक एका फार्महाऊसमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या वादातून प्रियकराने तरूणीच्या गळ्यावर, मानेवर, हातावर, दंडावर चॉपरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरिफ इसाक शेख (वय – 29, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरूणीने तक्रार दिली आहे.

फिर्यादी तरूणी आणि आरिफ यांच्यात प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी तरूणीने आरिफला उसने पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही तो रक्कम माघारी देत नव्हता. त्यामुळे तरूणीने आरिफकडे पैशांसाठी तगादा लावला होता. दरम्यान, 16 ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास आरिफने प्रेयसीला जेवण करण्याच्या बहाण्याने सासवड रस्त्यावरील एका फार्महाउसमध्ये नेले.

दोघांमध्ये पैशांमुळे वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे आरिफने प्रेयसीवर चॉपरने वार करून गंभीररित्या जखमी केले. मात्र, त्यावेळी तरूणीने त्याची माफी मागून पुन्हा पैसे मागणार नसल्याची ग्वाही दिली. त्यानंतर आरिफने तिला रूग्णालयात दाखल केले आणि स्वत:च प्रेयसीला मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती.

त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, आरिफनेच तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी दिली आहे.