
फसवणूकीच्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी मदत करण्याचे सांगत तक्रारदाराकडून एक लाख रूपयांची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राहूल अशोक पाटील (एपीआय वय 33) आणि संतोष भाउसाहेब खांदवे (वय 45, रा. लोहगाव ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
तक्रारदारांच्या वडिलांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि खासगी व्यक्ती खांदवे यांनी तक्रारदाराकडे तीन लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रूपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज पथकाने सापळा रचून संतोष खांदवे याला तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी एपीय पाटील यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































