सुटे पैसे आणायला गेलेल्या चालकाची रिक्षा पळवली, चोरट्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुकानातून सुटे पैसे आणण्यासाठी गेलेल्या चालकाची रिक्षा पळवून नेणाऱ्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. या चोराकडून रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. रोशन प्रकाश नरवडे (22, रा. संगमनेर, नगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राहुल रमेश आचघडे (42) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रिक्षाचोर सराईत दत्तवाडीतील एका दर्ग्याजवळ थांबल्याची माहिती हवालदार कुंदन शिंदे आणि शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार आणि चंद्रकांत कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रोशनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, राजू जाधव, शिवाजी क्षीरसागर, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, अक्षयकुमार वाबळे यांनी केली.

अशी केली रिक्षाची चोरी

आरोपी रोशनने सिटी प्राईड चौकातून दांडेकर पूल या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा थांबविली. त्यानंतर दांडेकर पूल परिसरात आल्यानंतर रिक्षाचालक राहुल दुकानामध्ये सुटे पैसे आणण्यासाठी गेले असता, रोशनने रिक्षा चोरून नेली, मात्र दत्तवाडी पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे चालकाला चोरीला गेलेली रिक्षा परत मिळाली.