आरोपी पकडा अन् रोख बक्षीस मिळवा, बंदूकधारी पकडल्यास दहा हजारांचे बक्षीस

पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून फायरींगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुंडाचा वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले असून या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे. यानुसार पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे. यानूसार पिस्तूल जवळ बाळणार्‍या (कलम 3, 25) आरोपी पकडणार्‍या कर्मचार्‍यास दहा हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर, कोयता बाळगणार्‍या (4, 25) आरोपीला पकडून आणल्यास तीन हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

विद्येचे माहेरघर, सांस्कृतीक राजधानी आणि माहिती तंत्रज्ञान हब अशी विविध बिरूदावली मिरविणार्‍या पुणे शहराचा सर्व क्षेत्रात झपाट्याने विकास होता असतानाच, वाढती गुन्हेगारी शांत पुण्याला आता अशांत करू पाहते आहे. गेल्या काही दिवसात शहरात घडलेल्या फायरींग आणि कोयत्याने मारहाणीच्या घटनांमुळे पुण्याचे नाव राज्यभर गाजले. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने विधानसभेत शहरातील कोयता गँगचा मुद्दा उचलल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. हडपसर, फुरसुंगी सह इतर काही भागात कोयता गँगने धुमाकूळ घातल्याने पुणे पोलिसांनी देखील कठोर पावले उचलत धडक कारवाईला सुरवात केली. कोयत्याने मारहाणीच्या घटना घडलेल्या ठिकाणी रुट मार्च काढत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार केली. तर, कोयता गँगचे वर्चस्व असलेल्या हडपसर भागातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना इशारा दिला. तसेच या सराईतांना कोयते पुरविणार्‍या काही विक्रेत्यांवर करवाई करून शेकडो कोयते जप्त केले आहेत. असे असले तरी या सर्व घटनांवरून शहरात गुन्हेगारी फोफवल्याचे स्पष्ट होत असून गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सराईतांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. पुणे पोलिसांनी बक्षीस योजना जाहीर केली असून आरोपींना पकडणार्‍या कर्मचार्‍यांवर बक्षीसांची खैरात केली जाणार आहे.

कारवाई शिर्षक             बक्षीस रक्कम

शस्त्र अधिनियम कलम 3,       25 दहा हजार रुपये
शस्त्र अधिनियम कलम 4,       25 तीन हजार रुपये
फरारी आरोपीस पकडणे.       10 हजार रुपये
पाहीजे आरोपीस पकडणे        5 हजार रुपये
मोक्कातील आरोपी पकडणे     5 हजार रुपये
एमपीडीएतील आरोपी पकडणे  5 हजार रुपये