
कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करून लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला जम्मू-कश्मिरातील कटरा येथून अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहजाद वाणी (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपुरातील एका तरुणीने याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हा पुण्यामध्ये एकत्र कामाला होते. या दरम्यान त्यांची ओळख झाली. आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली आणि लग्नाचे आमिष दाखवून 2015 ते 2017 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
पुणे, कटरा, जम्मू अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. तिचे नग्नावस्थेतील फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्ती केली. त्यानंतर लग्न करण्यासही नकार दिला. पीडित तरुणीने 2 जुलैला सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे एक पथक जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. त्यांनी आरोपीला अटक करून पुण्यात आणले. यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांची ही मोठी मदत केली.




























































