
ओळखीतील तरुणाला अडवून लुटमार करीत त्याच्याकडील रक्कम हिसकावून घेण्याचा प्रयत्न टोळक्याने केला, मात्र तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करणार्या एकाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना 16 डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास रामनगरमधील वेताळबुवा चौकात घडली.
वैभव दत्तात्रय भागवत (26 रा. रामनगर, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. योगेश डोळसे (26, रा. रामनगर वारजे) याने फिर्याद नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश आणि आरोपी रामनगरमध्ये राहायला असून एकमेकांच्या ओळखीतील आहेत. 16 डिसेंबरला योगेश दुचाकीवरून वेताळबुवा चौकातून घरी निघाले होते. त्यावेळी ओळखीतील टोळक्याने त्यांना अडविले. त्यांच्याकडून 600 रुपये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी टोळीपैकी एकाने योगेशच्या दिशेने गोळीबार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांच्यासह तपास पथकाने धाव घेतली. याप्रकरणी वैभव भागवत याला जेरबंद केले आहे. इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे तपास करीत आहेत.

























































