
फोनवरुन महिलांना अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या एका 84 वर्षीय भोंदू बाबाचे स्वारगेट पोलिसांनी बिंग फोडले आहे. पोलिसांनी त्याला सांगलीतून अटक केली. बाबाजी हरिदास महाराज उर्फ बाळकृष्ण पत्की बाबा असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागरमधील एका महिलेच्या सासूला सातत्याने ब्लँक कॉल येत होते. त्यामुळे महिलेने संबंधित क्रमांकावर फोन करुन त्याला पुन्हा कॉल न करण्याचे बजावले. मात्र, त्यानंतर महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अश्लिल मेसेज येऊ लागले. त्यामुळे त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तांत्रिक तपासात मोबाईलचे लोकेशन सातारा येथील असल्याचे पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी सीमकार्ड नावावर असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सात महिन्यांपुर्वी बाळकृष्ण पत्की बाबाला सीमकार्ड दिल्याचे पोलिसांना सांगितले. ते साताऱ्यातील यवतेश्वर मंदीरात पूजारी असल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली.
पोलिसांनी यवतेश्वर मंदीर प्रशासनाकडे माहिती घेतली असता, प्रशासनाने बाबाला चार महिन्यांपुर्वी कामावरुन काढून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बाबाच्या शिष्याकडून माहिती घेतली. त्यानुसार पत्की बाबा सांगलीतील शेणवडीत विठृठल मंदिरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणाहून पोलिसांनी पत्की बाबाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ५० वर्षांपुर्वी घर सोडल्याचे सांगत पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी याठिकाणी फिरत असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्याने पुण्यातील महिलेला अश्लिल मेसेज पाठविल्याची कबुली दिली.































































