
पुण्याच्या ललिता खैरे यांनी कोकम सरबत तयार करण्याचा व्यवसाय दोन दशकांपूर्वी सुरू केला. सुरुवातीला तोटा सहन करत अखेर त्यांनी व्यवसायावर पकड जमवली. आज ललिता यांनी बनवलेले कोकम सरबत मोठे स्टोअर, मॉलमध्ये विक्रीला आहे. अपयशातही हार न मारता जिद्दीने व्यवसायात पाय रोवून उभे राहणाऱ्या ललित यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.
नोकरी करणार नाही असा ठाम निर्धार करणाऱ्या ललिता खैरे यांच्या व्यवसायाने आज 2.5 कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. एकवेळ अशी आली होती की, त्यांना प्रचंड तोटय़ामुळे राहते घरही विकायला लागले होते. पती संजय खैरे यांच्या मदतीने ललिता यांनी जवळपास 20 वर्षांपूर्वी मशरूम शेतीला सुरुवात केली होती. सोबतच त्यांनी टोमॅटो केचअप आणि टुटी-फ्रुटी बनवण्यासही सुरुवात केली. या व्यवसायात त्यांना काहीही यश हाती लागलं नाही. त्यांनी हिंमत सोडली नाही. ललिता यांच्यासाठी एक जमेची बाजू होती ती म्हणजे त्यांच्या पतीची साथ. संजय खैरे यांनी ललिता यांना व्यवसायाच्या चढउतारात सातत्याने साथ दिली.
– 1995 साली ललिता आणि संजय यांनी कोकम सरबताचा व्यवसाय करायचं ठरवलं. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 500 रुपये होते, जे त्यांनी सगळेच्या सगळे या व्यवसायात गुंतवले. काही काळाने दोघांनी मिळून 500 किलो सरबत विकलं. मात्र सगळ्यांनी उत्पादन उधारीवर घेतलं असल्याने त्यातून एक पैसाही मिळाला नाही. यातून धडा घेत ललिता यांनी पुढील वर्षी 20 हजार रुपयांचा नफा मिळवला.
दिवसाला 12 टन उत्पादन
ललिता या कोकम सरबत घरीच बनवतात. त्यांच्या या व्यवसायामुळे आज 40 महिलांना रोजगार मिळाला आहे. खैरे दांपत्य दिवसाला 12 टन कोकम सरबत बनवते. ललिता सांगतात की, या व्यवसायामुळे महिलांना 4-5 महिन्यांचा रोजगार मिळतो. या रोजगारामुळे त्यांना उत्पन्नही मिळतं आणि वर्षातील उरलेला वेळ घराकडेही लक्ष देता येतं. ललिता यांचे ‘कोकम’राज सरबत मोठमोठय़ा मॉलमध्येही विकलं जातं.


























































