पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या अंतर्गत आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱयांची पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत गर्दी होताना दिसत आहे. कवठे येमाई येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शनिवारीही पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱयांनी मोठीच गर्दी केली होती.

येथील जिल्हा बँकेतून शेतकऱयांना तत्पर सेवा उपलब्ध होत आहे. कवठे विविध कार्यकारी सोसायटीने देखील मागील वर्षी पीक कर्ज घेणाऱ्या व 31 मार्च पूर्वी घेतलेले पीक कर्ज बँकेत जमा करणाऱ्या शेतकऱयांना प्राधान्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची तत्परता दाखवली आहे. विशेष म्हणजे या वर्षी पावसाने या भागात ही दगा दिल्याने अनेक शेतकऱयांना वरदान ठरत असलेला डिंभा उजवा कालवा,घोडनदी व विहिरीतून उपलब्ध झालेल्या पाण्यावर विविध शेती पिकांचे उत्पादन करीत उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून मिळालेले पैसे वेळेत बँकेत कर्ज खाती भरणा केल्याने यावर्षी खरीप हंगामासाठी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बहुसंख्य शेतकऱयांनी मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज मार्च अखेरपूर्वीच जमा केले असून चालू हंगामासाठी शेतकऱयांना कवठे येमाई,मुंजाळवाडी,सविंदणे सोसायटी अंतर्गत उपलब्ध करण्यात आलेले पीककर्ज वाटप सुरू आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून ही सुमारे सव्वा तेरा कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ठ असताना 14 कोटी 50 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी हिताचेच निर्णय घेण्यात येत असून रोख स्वरूपात पीक कर्जपुरवठा करण्यात येत आहे. या शाखेकडून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा येथील सर्व कर्मचाऱयांचा सातत्याने प्रयत्न सुरु असल्याने या शाखेची आर्थिक उलाढाल व प्रगती चांगली होत असल्याने या परिसरातून ग्राहक समाधान व्यक्त करीत आहेत.