पुण्यात सराईत खंडणीखोर भुईसपाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
उद्योजकांसह व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या सराईतांविरूद्ध पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकांनी दंड थोपटले आहेत. मागील दोन वर्षांत पथकांनी 71 हून अधिक खंडणीच्या गुन्ह्यातील तब्बल 372 पेक्षा जास्त गुंडाविरूद्ध कारवाई करीत  त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेषतः संबंधित गुंड नामचिन टोळ्यांनी अनेकांना धमकावत खंडणीचा हैदोस घातला होता. टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी वेळोवेळी कायद्याचा धाक दाखवित त्यांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच  कारवाईची दिशा ठरविण्यात येत असल्यामुळे अपहरण, जीवे मारण्याची धमकीने खंडणी उकळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
सराईत टोळ्यासह खंडणीखोरांविरूद्ध कारवाई करण्यासाठी दोन स्वंतत्र खंडणी विरोधी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्याशिवाय पोलीस ठाण्यातंर्गत दाखल तक्रारीनुसारही कारवाईचा बडगा उगारल्यामुळे  छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांपासून बड्या उद्योजकांची होणारी  आर्थिंक वाटमारी थांबण्यास मदत झाली आहे. हद्दीत भाईगिरी करीत पथारीवाल्यांकडून हप्ता घेणे,  व्यावसायिकांकडून दरमहिन्याला खंडणी वसूल करणे, किरकोळ व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणे, खंडणी न देणाऱ्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणे, या गुंडांची पोलिसांकडून हजेरी घेतली जात आहे. संबंधित आरोपींचा डेटा तयार करण्यात आला असून, त्याद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. खंडणीखोरांसह बेकायदेशिररित्या सावकारी करणाऱ्यांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करून कारागृहात रवानगीचा  धडाका लावल्यामुळे  गुन्हेगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश टोळ्यातील सराईत गजाआड करण्यात आल्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दादागिरी करीत धमकावून  खंडणी मागणे,  जीवे मारण्याची धमकी देत अपहरण करणे, मैत्रीपूर्ण आर्थिंक व्यवहाराचा गैरफायदा घेत वसुलीसाठी सराईत गुंडांना मध्यस्थीला भाग पाडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या टोळयांचा बिमोड करण्याचे आव्हान खंडणी विरोधी पथकांसह स्थानिक पोलिसांसमोर होते. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीनिवास घाडगे, खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकांनी खंडणीखोरांविरूद्ध कारवाईचा फास आवळला. मागील दोन वर्षांत खंडणी विरोधी पथक एकने 31 हून अधिक गुन्ह्यात 165 जणांना अटक केली. तर खंडणी विरोधी पथक दोनने 40 गुन्ह्यात 202 खंडणीखोरांना कारागृहात डांबले आहे. त्यामुळे शहरातील उद्योजक, व्यावसायिक, किरकोळ व्यापारी, विव्रेâत्यांचा मनस्ताप संपुष्टात आला आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकापासून ते उद्योजकांची खंडणीखोरांकडून होणारी आर्थिंक वाटमारी थांबविण्याचे आव्हान होते. त्यानुसार खंडणीविरोधी पथकांनी  दोन वर्षांत ठिकठिकाणी कारवाया करीत गुन्हेगारांचा फास आवळल्यामुळे  सर्वसामान्य नागरिकांपासून अनेकांना फायदा झाला आहे. नामचिन टोळ्या, सराईत गुंडाची कारागृहात रवानगी केल्यामुळे खंडणीचे प्रमाणही घटले आहे – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर