पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर आला, तिघांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला

प्रातिनिधिक फोटो

दुचाकीची सर्व्हीसिंग करण्यासाठी गेलेल्या सराईतावर तिघांनी हल्ला करुन खून केल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पिसोळीतील बालाजी गॅरेजसमोर घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सागर दादा औताडे (वय – 23, रा. औताडेवाडी ) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. पुरुषोत्तम मंडावळे (वय – 25, रा. वडाची वाडी ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कोंढवा परिसरातील सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध मारामारीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी तो तुरुंगातून बाहेर आला होता. काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सागर दुचाकीची सर्व्हीसिंग करण्यासाठी बालाजी गॅरेजमध्ये आला होता. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी सागरवर शस्त्राने वार करुन खून केला.

‘पिसोळीतील बालाजी गॅरेजसमोर काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास तिघांनी सागरवर खुनी हल्ला केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे’, अशी माहिती कोंढवाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या