
कोयत्याच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. हडपसर भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
प्रसाद उर्फ भैया दादू शिरवळे (वय 21, रा.शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयताधरी आरोपींवर कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. यानुसार शहरात दहशत माजविणारे शेकडो आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना हडपसर भागात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार प्रसाद हा एसआरए बिल्डिंग परिसरात आल्याची माहिती अंमलदार अशफाक मुलाणी यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून प्रसाद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपी हा फरासखाना पोलिसांकडील फरार गुन्हेगार असल्याचे समोर आले. यानुसार त्याला फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
































































