Lok Sabha 2019 मावळमधून पार्थ पवार लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे; तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला.

शरद पवार यांनी यापूर्वी दोन वेळा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. तो बदलून या निवडणुकीत त्यांनी माढय़ातून निवडणूक लढविण्याचे घोषित केले होते. मात्र त्यांनी बदलती राजकीय स्थिती आणि कुटुंबातील किती व्यक्ती उभ्या राहणार, असा प्रश्न उपस्थित करीत निवडणुकीतून माघार घेतली.

बारामती हॉस्टेल येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत पवारांनी घोषणा केली. पवार म्हणले, ‘‘माढय़ात मी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत होती. मीही सकारात्मक विचार करीत होतो. मात्र मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी आग्रह होत आहे. शेतकरी कामगार पक्षाचीही तशी मागणी आहे. असेही पवार म्हणाले. ‘‘येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल,’’ असेही त्यांनी सांगितले.