
बिबवेवाडी परिसरात दहशत माजवून लुटमार करणार्या सराईत योगेश रमेश जगधने (टोळी प्रमुख) याच्यासह तीन साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही चौथी कारवाई आहे.
योगेश रमेश जगधने (वय 26 टोळी प्रमुख) उमेश रमेश जगधने (वय 31 दोघेही रा.शेंडकर चाळ,गणपतनगर, पापळ वस्ती, बिबवेवाडी) विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय 23 रा. बिबवेनगर बिबवेवाडी) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत जगधने टोळीविरूद्ध खुनाचा प्रयत्न, हत्याराचा धाक दाखवुन दरोडा घालणे, दरोड्याची तयारी करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी करणे, जीवे ठार मारण्याची धमकीचे गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. याप्रकरणी संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव यांनी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यावतीने अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला.
जगधने टोळीविरूद्ध मोक्का प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. टोळीमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. तिघेही आरोपी दाखल गुन्हयात येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. गुन्हयाचा तपास सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक विवेक सिसाळ, उपनिरीक्षक विक्रांत डिगे, राजकुमार बारबोले, दैवत शेडगे, अनिल डोळसे यांनी केली आहे.
नागरिकांना वेठीस धरून दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाईसाठी मोक्का कायद्याचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्याशिवाय शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्राधान्य दिले असून हल्लेखोरांविरूद्ध कारवाईची ठोस मोहिम हाती घेतली आहे. – रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर


































































